संशयित आरोपीविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
लांजा : प्रतिनिधी
तालुक्यातील गोविळ स्टॉप येथे बोलेरो पिकअप वाहनातून दोन बैलांची अत्यंत दाटीवाटीने, निर्दयतेने आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनासह दोन बैल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गणेश गणपत लांबोरे (वय २७, रा. वाडगाव रोड, कालभैरवनगर, धुंदरे, ता. लांजा) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविळ स्टॉप येथे नाकेबंदी दरम्यान कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास लांजा-गोविळ मार्गावरून संशयित बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच-०८-एपी-१२११) जात होती. गोविळ स्टॉप येथे पोलिसांनी हे वाहन थांबवून पाहणी केली असता वाहनाच्या हौद्याला चारही बाजूंनी निळ्या व काळ्या रंगाची ताडपत्री घट्ट बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहनात जनावरांसाठी हवा खेळती राहण्यास अजिबात जागा उपलब्ध नव्हती.
जनावरांची निर्दयी वाहतूक अन् नियमांचे उल्लंघन वाहनाची कसून पाहणी केली असता, त्यात दोन बैलांना अत्यंत आखूड दोरीने बांधून कोंबण्यात आल्याचे दिसून आले. जनावरांच्या सुरक्षित आणि रीतसर वाहतुकीसाठी आवश्यक असणारे विभाजन (पार्टीशन), प्रथमोपचार पेटी, तसेच चारा-पाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती. याशिवाय, जनावरांची आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि वाहतुकीसाठी लागणारी अधिकृत परवानगी न घेताच ही वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
आरोपीवर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज मौला नाईकवाडे यांनी लांजा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार दिली. त्यानुसार आरोपी गणेश लांबोरे याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, प्राणी वाहतूक नियम आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपी गणेश लांबोरे याच्याविरुद्ध यापूर्वीही लांजा आणि देवरुख पोलीस ठाण्यांत प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली असून, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल यु. यु. शेडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 24-08-2026














