NCMC कार्ड नोंदणी: रत्नागिरीत प्रभाग ६ मध्ये विशेष शिबिर; १८५ नागरिकांनी घेतला लाभ

ना. उदय सामंत आणि आ. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर; ज्येष्ठ नागरिक व महिलांना मिळणार ५० ते १०० टक्के सवलत

रत्नागिरी : प्रतिनिधी

नागरिकांना आधुनिक, सुलभ आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये NCMC कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. शिवसेना नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या सौजन्याने आणि शिवसेना नगरसेवक श्री. राजीव यशवंत कीर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी (२३ ऑगस्ट) आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

१८५ नागरिकांनी केली NCMC कार्डसाठी नोंदणी या विशेष शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील तब्बल १८५ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या NCMC कार्डसाठी यशस्वी नोंदणी केली. नोंदणी करणाऱ्यांमध्ये ६० मुली, ८० महिला आणि ४५ पुरुषांचा समावेश आहे. NCMC कार्डच्या सुविधेमुळे एसटी बस प्रवासाचे तिकीट खरेदी अधिक सुलभ, सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार असून, प्रवाशांना कॅशलेस पेमेंट आणि प्रवासासाठी एकाच कार्डचा वापर करणे शक्य होणार आहे.

नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते शुभारंभ शिबिराच्या शुभारंभप्रसंगी रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांचे विभाग प्रमुख श्री. मनोज साळवी व उपविभाग प्रमुख श्री. नरेंद्र देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच NCMC कार्ड समृद्धी सर्विसेसचे श्री. संदीप चव्हाण यांचेही स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सौ. स्नेहा चव्हाण यांचे सौ. सोनाली सावंत यांनी, तर मैथिली भोसले यांचे सौ. विशाखा भिडे यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले.

Swami swaru. Pat.

पाच वर्षांची वैधता; प्रवासाच्या गरजेनुसार करा रिचार्ज उपस्थित नागरिकांना NCMC कार्डच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी म्हणाल्या की, “NCMC कार्डची वैधता पाच वर्षांची असून कार्डसाठी दर महिन्याला रिचार्ज करण्याची कोणतीही सक्ती नाही. नागरिकांनी गरजेनुसार शंभर रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत यामध्ये रिचार्ज करावे आणि प्रवास करतानाच तिकिटाचे पैसे कट होतील.”

हे कार्ड ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट माफी, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तिकीट सवलत, तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत पात्र महिलांना ५० टक्के तिकीट सवलत या कार्डद्वारे सहज मिळणार आहे. रिचार्जची सुविधा एस.टी. बसच्या कंडक्टरकडून, एस.टी. बसस्थानकावर, G-Pay च्या माध्यमातून तसेच समृद्धी सर्विसेससारख्या अधिकृत एजन्सींकडून उपलब्ध असणार आहे.

महिनाभराने बसस्थानकावर मिळणार कार्ड शिबिरात नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना त्वरित नोंदणी पावती देण्यात आली आहे. नोंदणीनंतर सुमारे एका महिन्याने हे NCMC कार्ड रत्नागिरी एस.टी. बसस्थानकातील चौकशी खिडकीच्या बाजूला उपलब्ध करून दिले जाईल. नागरिकांनी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत आपली पावती दाखवून बसस्थानकावरून कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन नगरसेविका मेधा कुळकर्णी यांनी केले. पूर्वनोंदणी व टोकन व्यवस्थेमुळे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या आयोजनाबद्दल प्रभागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 24-08-2026