Ratnagiri School Anukampa Recruitment: ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अनुकंपा तत्वावरील भरती पूर्ण करण्याचे निर्देश

खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील प्रकरणांचा तातडीने निपटारा; शिक्षण विभागाचे आदेश

रत्नागिरी :

राज्यातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यात आले असून, येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

‘परिशिष्ट-क’नुसार अर्जाची पुनर्रचना आणि काटेकोर छाननी अनुकंपा नियुक्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र वारसदारांनी शासन निर्णयातील ‘परिशिष्ट-क’ मधील विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक या अर्जांची प्राथमिक आणि कडक छाननी करतील. त्यानंतर हे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे वेळेत पाठवणे आवश्यक आहे. अर्जात त्रुटी राहिल्यास किंवा अपूर्ण प्रस्तावांमुळे कार्यवाहीस विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्थाचालक व मुख्याध्यापकांची राहील, असा कडक इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे अंतिम मंजुरीची जबाबदारी शाळांकडून प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची अंतिम पडताळणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत केली जाईल. शासन नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या कालमर्यादेत म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियुक्तीपत्र देण्याची अंतिम जबाबदारी संबंधित विभागाची असणार आहे.

समन्वयाने काम करण्याचे शिक्षण संचालकांचे आवाहन अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती ही केवळ एक प्रक्रिया नसून, दुःखात असलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक आणि पात्र उमेदवारांनी आपापसांत योग्य समन्वय ठेवून ही प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालकांकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 24-08-2026