Ratnagiri Traffic Police Action: रत्नागिरीत ट्रॅव्हल्स चालकांवर पोलिसांची धडक कारवाई; रस्त्यावर बेजबाबदारपणे बस उभी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

तेली आळी नाका ते आठवडा बाजार मार्गावर शहर पोलिसांची कारवाई; निष्काळजीपणे वाहने उभी करणाऱ्यांना इशारा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरात रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर बेजबाबदारपणे ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या करणाऱ्या दोन चालकांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। रविवारी रात्रीच्या सुमारास तेली आळी नाका ते आठवडा बाजारकडे जाणाऱ्या मार्गावर शहर पोलिसांनी ही कडक कारवाई केली।

वक्रतुंड ट्रॅव्हल्सच्या बस चालकावर पहिली कारवाई रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तेली आळी नाका ते आठवडा बाजार मार्गावरील वक्रतुंड ट्रॅव्हल्स दुकानासमोर ही घटना घडली। आरोपी साईनाथ बाळू पिसाळ (वय ३८, मूळ रा. वाई, जि. सातारा; सध्या रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स बस (क्र. MH 09 GJ 4356) रस्त्यावर ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना व रहदारीस अडथळा होईल अशा स्थितीत उभी केली होती। या प्रकरणी पोलीस हवालदार कशल सुरेश हातिस्कर यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे।

स्वामी ट्रॅव्हल्स दुकानासमोर दुसरी कारवाई याच दिवशी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास तेली आळी नाका ते आठवडा बाजार कडे जाणाऱ्या स्वामी ट्रॅव्हल्स दुकाना समोरील रस्त्यावर दुसरी कारवाई करण्यात आली। आरोपी वैभव रामचंद्र कदम (वय ३८, मूळ रा. भेलसई, ता. खेड; सध्या रा. खेर्डी, चिपळूण) याने आपल्या ताब्यातील वक्रतुंड ट्रॅव्हल्सची गाडी (क्र. MH 47 BL 8879) रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा निष्काळजीपणे पार्क केली होती। या प्रकरणी पोलीस हवालदार पंकज यशवंत पडेलकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे।

मुख्य रस्त्यांवर अनधिकृत आणि निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ट्रॅव्हल्स व इतर वाहनचालकांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 24-08-2026