Chiplun Municipal Council Action: मोकाट गाढवांच्या मालकांवर चिपळूण न.प.ची दंडात्मक कारवाई

तीन गाढवांच्या मालकांकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल

चिपळूण :

शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागांत मोकाट सोडण्यात येणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या समस्येची गंभीर दखल घेत चिपळूण नगर परिषदेने मोकाट जनावरांवर धडक कारवाई सुरू केली आहे. नगर परिषदेने ताब्यात घेतलेल्या १० मोकाट गाढवांपैकी तीन गाढवांच्या मालकांकडून प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतुकीस अडथळा आणि वाढते अपघात शहरात शेकडो मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. काही मालक दिवसभर या जनावरांचा कामासाठी वापर करतात आणि सायंकाळी त्यांना शहरात मोकाट सोडून देतात, अशा तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. या मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे अशा जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती.

आरोग्य विभागाची विशेष मोहीम या पार्श्वभूमीवर न.प.चे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागांतून मोकाट जनावरे ताब्यात घेण्याची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते व त्यांच्या पथकाने ही मोहीम हाती घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांच्या मालकांकडून दंडात्मक वसुली केली जात असून, यापुढे शहरात जनावरे मोकाट सोडल्यास आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा नगर परिषदेने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 24-08-2026