पावसाळ्यातील धोकादायक स्थिती ओसरल्याने ग्रामपंचायतीचा निर्णय; सुरक्षेच्या नियमांचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन
गणपतीपुळे बीच खुला झाल्यामुळे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यातील धोकादायक स्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून समुद्रकिनाऱ्यावर दोरी टाकून बीच पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. परंतु, समुद्रातील धोकादायक स्थिती कमी होऊ लागल्याने आणि पावसाचा जोर ओसरल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिक व ग्रामस्थांनी बीच खुला करण्याची आग्रही मागणी केली होती. अखेर, गणपतीपुळे ग्रामपंचायतीने २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून हा बीच पर्यटकांसाठी पुन्हा पूर्णपणे खुला केला आहे.
विशेष ग्रामसभेत मागणी आणि ग्रामपंचायतीचा निर्णय
पर्यटकांसाठी बीच पुन्हा सुरू व्हावा यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे वारंवार विचारणा व पाठपुरावा केला जात होता. सोमवारी गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती मिळताच स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांनी थेट ग्रामसभेत उपस्थित राहून बीच खुला करण्याची मागणी लावून धरली. या जनभावनेची आणि परिस्थितीची दखल घेत ग्रामपंचायतीने २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून बीच खुला करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक पर्यटन व्यवसायाला गती आणि सुरक्षेचे आवाहन
ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या मागणीला मोठे यश मिळाले असून, संपूर्ण गणपतीपुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, बीच खुला झाला असला तरी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात उतरू नये, तसेच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि पोलिस यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 25-08-2026














