Miss Universe India 2026 Winner: काझिया लिझ मेजो ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ ची मानकरी!

केरळच्या १९ वर्षीय काझियाने पटकावला प्रतिष्ठित मुकुट; नोव्हेंबरमध्ये पोर्तो रिको येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

काझिया लिझ मेजो ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ (Miss Universe India 2026) ची मानकरी ठरली आहे. राजस्थानमधील जयपूर येथे पार पडलेल्या भव्य अंतिम सोहळ्यात केरळच्या १९ वर्षीय काझिया लिझ मेजोची या प्रतिष्ठित राष्ट्रीय किताबासाठी निवड करण्यात आली. ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२५’ ची विजेती मानिका विश्वकर्मा हिने काझियाला मुकुट परिधान करून हा सन्मान अधिकृतपणे सोपवला. या ऐतिहासिक विजयानंतर काझिया नोव्हेंबर २०२६ मध्ये पोर्तो रिको येथे होणाऱ्या ७५ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

‘टॉप ३’ स्पर्धक आणि कडक मूल्यमापन

या स्पर्धेत देशाभरातून ५२ स्पर्धक सहभागी झाले होते, ज्यांनी अनेक महिन्यांच्या ऑडिशन्स आणि प्राथमिक फेऱ्यांमधून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम मूल्यमापनानंतर तमिळनाडूची वैष्णवी गणेश आणि गुजरातची अनुश्री सातवळेकर यांनी उर्वरित स्थाने पटकावत ‘टॉप ३’ मध्ये स्थान निश्चित केले. अंतिम फेरीतील पहिल्या ५ स्पर्धकांमध्ये महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांचाही समावेश होता. अंतिम फेरीत ४० सेकंदांच्या समारोपाच्या भाषणाचे आव्हान लीलया पेलत काझियाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

सुष्मिता सेन यांच्या नेतृत्वाखालील ज्युरी पॅनेल

या अंतिम सोहळ्याच्या परीक्षक (ज्युरी) मंडळाचे नेतृत्व भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ (१९९४) सुष्मिता सेन यांनी केले. या पॅनेलमध्ये माजी विजेत्या सेलिना जेटली, उर्वशी रौतेला, रिया सिंघा यांच्यासह प्रज्ञा कपूर, विशा लाढिया, ॲना ब्लँको, डॉ. स्तुती खरे शुक्ला आणि ‘ग्लॅमानंद ग्रुप’चे अध्यक्ष उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 25-08-2026