‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ ग्रुपचा उपक्रम; लोको पायलटचा सत्कार करत इतर गाड्यांच्या थांब्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
नेत्रावती एक्सप्रेस थांब्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात एका छोटेखानी आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ या फेसबुक ग्रुपच्या वतीने २२ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम पार पडला. २२ ऑगस्ट २०२३ रोजी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला होता.
प्रवाशांसाठी ठरली महत्त्वपूर्ण सुविधा
गेल्या तीन वर्षांत हा थांबा संगमेश्वर तालुक्यातील चाकरमानी, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पर्यटक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचा व महत्त्वाचा ठरला आहे. तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त संगमेश्वर रोड स्थानकात आलेल्या नेत्रावती एक्सप्रेसचे ढोल-ताशांच्या आणि उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी गाडीला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या लोको पायलटचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
अधिक गाड्यांच्या थांब्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार
या कार्यक्रमाला फेसबुक ग्रुपचे प्रमुख व पत्रकार संदेश जिमन, गणपत दाभोलकर, नितेश मालप, इशांत जिमन, आरुष मालप आणि पुष्कर गीते उपस्थित होते. नेत्रावती एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मात्र, संगमेश्वर रोड स्थानकावर इतरही महत्त्वाच्या द्रुतगती (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा मिळावा, यासाठीचा पाठपुरावा असाच सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. “एक थांबा मिळाला म्हणून आमचा संघर्ष थांबलेला नाही; संगमेश्वरच्या रेल्वे विकासासाठी आणि प्रवाशांच्या हक्कासाठी लढा पुढेही सुरूच राहील,” असा ठाम निर्धार संदेश जिमन यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 25-08-2026














