‘अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ कंपनीकडून मंत्रालयात सादरीकरण; सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित, रोजगारनिर्मितीला मिळणार चालना
राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्प विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशासकीय सहकार्य करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत. मुंबई येथे तळसुंदे (ता. राजापूर) येथील प्रस्तावित राजापूर बंदर आणि जहाज बांधणी प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.
अँड शुअर पोर्ट कंपनीकडून सादरीकरण आणि १०० एकर जागा संपादित
या प्रकल्पाबाबत ‘अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयात सविस्तर सादरीकरण (Presentation) करण्यात आले. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीने राजापूर परिसरात सुमारे १०० एकर जागा आधीच अधिग्रहित केली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील विकासासाठी गुंतवणूकदार तसेच सक्षम भागीदार सहकार्य करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून प्रशासनाने संबंधितांना सहकार्य करावे, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.
रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार गती
राजापूर परिसरातील उपलब्ध भौगोलिक क्षमता आणि बंदराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती तसेच बंदराशी निगडित विविध उपक्रम विकसित झाल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तसेच, यामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे (MMB) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 25-08-2026














