Pali Bike Theft Solved: पाली येथे दुचाकी चोरीचा २४ तासांत छडा: पोलिसांनी सिंधुदुर्गातून हस्तगत केली चोरीची दुचाकी

पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे आणि पथकाची धडक कारवाई; देवगड-निपाणी महामार्गावरून दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

पाली येथे दुचाकी चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पाली पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. घरासमोरून चोरीला गेलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-निपाणी रस्त्यावरून ताब्यात घेतली आहे.

घरासमोरून दुचाकी लांबवली आणि पोलिसांत तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पाली घडशीवाडी येथील रहिवासी सचिन शिवाजी गोंधळी यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच ०८ एव्ही ४२९२) २० ऑगस्ट रोजी रात्री घडशीवाडी येथील सुमित्रा चाळीतील आपल्या घरासमोर उभी केली होती. २१ ऑगस्ट रोजी सकाळी पाहणी केली असता दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी तातडीने पाली पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. या खबरेवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

देवगड-निपाणी रस्त्यावरून दुचाकी हस्तगत; पोलिसांचे कौतुक

तक्रार दाखल होताच पाली पोलीस दूरक्षेत्राचे तपासी अंमलदार हेडकॉन्स्टेबल सागर जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सदर दुचाकी २१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड – निपाणी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी सुरक्षितपणे ताब्यात घेतली. २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 25-08-2026