राजीवडा येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला धार्मिक सोहळा; ढोल-ताशांच्या गजरात व अभंगाच्या तालावर दुमदुमला परिसर
भैरी-शिवाची भेट या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आयोजित अभूतपूर्व सोहळ्याने रत्नागिरीतील हजारो भाविकांना भक्तीरसात चिंब भिजवले. शहरातल्या राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि रत्नागिरीचे ग्रामदैवत मांडवी येथील श्रीदेव भैरी या दोन दैवतांच्या भेटीचा हा सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘काय वर्णू ती मी शोभा आजच्या दिनाची, भेट झाली पहा हो भैरी-शिवाची’ या अभंगाच्या तालावर दोन्ही देवांची भेट होत असताना हजारो भक्तगण तल्लीन झाले होते.
नामसप्ताहाची सांगता आणि पालखी मिरवणूक
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि श्रीदेव भैरी देवाच्या मंदिरांमध्ये नामसप्तहास सुरुवात होते. श्रावणी दुसऱ्या सोमवारी या नामसप्ताहाची सांगता होत असतानाच श्रीदेव काशीविश्वेश्वराच्या भेटीला श्रीदेव भैरीची पालखी राजीवडा येथे येते. या परंपरेनुसार सोमवारी दोन्ही देवांच्या पालख्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने निघाल्या. या सोहळ्यात संपूर्ण रत्नागिरी शहरातून आलेले हजारो भाविक सहभागी झाले होते.
पाच प्रदक्षिणा आणि भेटीचा सुवर्णयोग
श्रीदेव काशीविश्वेश्वराच्या पालखीने राजीवड्यातील मंदिराभोवती ५ प्रदक्षिणा घातल्या. यातील तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी श्रीदेव भैरी देवाच्या पालखी भेटीचा सोहळा पार पडला. तत्पूर्वी, मांडवी येथील श्री भैरी देवाची पालखी विठ्ठल मंदिर, तेली आळी नाका व खडपेवठार मार्गे राजीवडा धारेवरून श्री काशीविश्वेश्वराच्या भेटीसाठी मंदिराच्या दिशेने आली. दोन्ही पालख्यांची भेट होताच भाविकांनी जयघोष केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 25-08-2026














