लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात महावितरणच्या माध्यमातून अडीच वर्षांत मोठी वीज सुधारणा; पोल, रोहित्र आणि वीज वाहिन्यांचे नूतनीकरण
ग्रामीण भागाला सुरळीत, अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भय्या सामंत यांनी घेतलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. जानेवारी २०२४ पासून जुलै २०२६ या अडीच वर्षांच्या कालावधीत महावितरण कंपनीच्या माध्यमातून या मतदारसंघात ऐतिहासिक स्वरूपाची वीज सुधारणा व विस्ताराची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. कोकणातील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि पावसाळ्याचे आव्हान लक्षात घेता नागरिकांना वीजपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी आमदार सामंत यांनी सतत पाठपुरावा करून ही कामे मार्गी लावली आहेत.
गंजलेले खांब आणि डीपी स्ट्रक्चर्स बदलून नूतनीकरण
या सर्वसमावेशक विकासकामांतर्गत देवरूख, लांजा, राजापूर १ आणि राजापूर २ या उपविभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या व जीर्ण यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वीजपुरवठा अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी देवरूख उपविभागात ४७८, लांजा उपविभागात ५२८, राजापूर १ मध्ये ४९२ तर राजापूर २ उपविभागात ३०० असे एकूण मिळून अनेक गंजलेले लघुदाब खांब तातडीने बदलण्यात आले आहेत. याशिवाय उच्चदाब वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी देवरूखमध्ये ९८, लांजात ६७, राजापूर १ मध्ये ७८ आणि राजापूर २ उपविभागात ७५ गंजलेले उच्चदाब खांब बदलले गेले आहेत. वीज वितरणाचा कणा मानल्या जाणाऱ्या डीपी स्ट्रक्चर्समधील गंजलेले खांब बदलण्याबाबतही विशेष लक्ष देत देवरूखमध्ये ४, लांजात ७, राजापूर १ मध्ये ६ व राजापूर २ मध्ये ८ गंजलेले डीपी स्ट्रक्चर्स बदलण्यात आले आहेत.
नवीन वीज वाहिन्या आणि रोहित्रांची उभारणी
वीज वाहिन्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन लघुदाब वाहिनी आणि नवीन उच्चदाब वाहिनी टाकण्याचे मोठे जाळे मतदारसंघात उभारण्यात आले आहे. देवरूखमध्ये २५ कि.मी., लांजा उपविभागात ३० कि.मी., राजापूर १ मध्ये २८ कि.मी. आणि राजापूर २ मध्ये २७ कि.मी. लांबीची नवीन लघुदाब वाहिनी टाकण्यात आली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीच्या विस्तारांतर्गत देवरूखमध्ये ५ कि.मी., लांजात ७ कि.मी., राजापूर १ मध्ये ६ कि.मी. आणि राजापूर २ उपविभागात ८ कि.मी. नवीन उच्चदाब वाहिनी टाकण्यात आली आहे. वाढत्या वीजभारामुळे होणारी ट्रिपिंगची समस्या सोडवण्यासाठी नवीन रोहित्रांची उभारणी करण्यात आली असून यामध्ये देवरूखमध्ये १३, लांजात १५, राजापूर १ मध्ये १२ आणि राजापूर २ उपविभागात १० नवीन रोहित्र बसवण्यात आले आहेत. याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 25-08-2026














