बाळासाहेब खेर कृतज्ञता दिन सोहळा: रत्नागिरीत ७८ वर्षांनंतरही कार्य जिवंत; माधव अंकलगे यांचे प्रतिपादन

बाळासाहेब खेर कृतज्ञता दिन सोहळा रत्नागिरी येथील सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. राजकारणात कार्यरत राहिले तरी कोणतीही अपेक्षा न ठेवता मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी विराट कार्य करून ठेवले आहे. त्यांनी रत्नागिरीसाठी यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाची स्थापना केली असून, आज ७८ वर्षांनंतरही त्यांचे कार्य जिवंत आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ५ वर्षांचा आराखडा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. येथून घडणारे विद्यार्थी न्याय व्यवस्था, प्रशासन, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत अव्वल स्थान पटकावतील, यासाठी पुढील ५ वर्षांचा आराखडा तयार करून एकत्रित प्रयत्न करण्याचे त्यांनी सुचवले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ‘सर्वोदय कट्टा’ हा उपक्रम सुरू करून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पुरस्कार वितरण आणि सामाजिक सत्कार

Ratnagiri Khabardar add image

या सोहळ्यात सर्वोदय छात्रालयातील विद्यार्थी अथर्व दत्ताराम पांचाळ याला ‘श्रीमान बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. यासोबतच तात्या ताई शिष्यवृत्ती, कै. पद्मजा व कै. विष्णू बर्वे शिष्यवृत्ती, कै. राजाराम पांगम शिष्यवृत्ती, कै. हेमलता गीते शिष्यवृत्ती आणि कै. शैलजा भाटकर शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश ऊर्फ अण्णा लिमये यांचा विशेष सत्कार हरिश्चंद्र गीते यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच संस्थेचे हितचिंतक विजयानंद जोशी यांनी देणगीचा धनादेश अध्यक्षांकडे सुपूर्द केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 25-08-2026