अंडर-१२ गटात जतीन भोसलेचा ४ सुवर्णपदकांसह धुमाकूळ; रुद्र सरफरे आणि आर्णा देवळेकर यांचीही चमकदार कामगिरी
अॅक्वाटेक्निक्स स्विमिंग अकॅडमी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. ‘अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ तर्फे आयोजित आणि ‘महाराष्ट्र एक्वाटिक असोसिएशन’च्या मान्यतेने पार पडलेल्या ‘१st महाराष्ट्र स्टेट पब्लिक अँड प्रायव्हेट स्कूल इन्व्हिटेशनल फिनस्विमिंग अँड स्विमिंग चॅम्पियनशिप’मध्ये अकॅडमीच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावत जिल्ह्याचा गौरव वाढवला.
जतीन भोसले ‘अंडर-१२ चॅम्पियन’; पदकांची लुटालूट
या स्पर्धेत अॅक्वाटेक्निक्स अकॅडमीच्या जतीन भोसले याने Under-12 गटात ५० व १०० मीटर फ्रीस्टाईल तसेच ५० व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या चारही प्रकारांत सुवर्णपदके पटकावून ‘Under-12 Boys Champion Trophy’वर आपले नाव कोरले. तसेच Under-6 गटात आर्णा देवळेकर हिने बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, तर फ्रीस्टाईल व बटरफ्लाय प्रकारात रौप्यपदक मिळवले. Under-12 गटात रुद्र परेश सरफरे याने १०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, १०० मीटर फ्रीस्टाईल व फिनस्विमिंगमध्ये रौप्य, तर ५० मीटर फ्रीस्टाईल व बटरफ्लायमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. Under-16 गटात वैभवी देसाई हिने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले.
प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन व इतर खेळाडूंचा सहभाग
स्पर्धेत अकॅडमीच्या झैन मापारी, हर्ष शेलार, आज्ञा शिंदे, केदार सुर्वे, रादनी साळवी, क्रिशा, श्लोका, अनाहत, गार्गी साळवी, रुद्र लाड, क्रिशा गंधारे, कृष्णल गांधारे आणि ट्रिया विलणकर या खेळाडूंनीही उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडाकौशल्य दाखवले. खेळाडूंच्या या यशामागे मुख्य प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीतील युवा जलतरणपटूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी ते सातत्याने कठोर परिश्रम घेत आहेत. यशस्वी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे रत्नागिरीतून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 25-08-2026














