Mandangad Crime: दहागाव-जाधववाडीतील ८.४० लाखांची घरफोडी उघड; मंडणगड पोलिसांची मुंबईत धडक कारवाई, संशयिताला अटक

कपाटाच्या लॉकरमधून लांबवले होते सोन्याचे मंगळसूत्र; ६४.४८ ग्रॅमचे दागिने जप्त

मंडणगड तालुक्यातील दहागाव-जाधववाडी येथे घरातील कपाटाचे लॉकर उघडून तब्बल आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या चोराला गजाआड करण्यात मंडणगड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला मुंबई येथून ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्रही पूर्णपणे हस्तगत केले आहे.

अशी घडली चोरीची घटना

पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ही घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी रवींद्र विष्णू जाधव (वय ३४, रा. दहागाव जाधववाडी, मंडणगड) यांच्या घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून, त्यात ठेवलेले त्यांच्या पत्नी अर्चना जाधव यांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोराने लांबवले होते. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईतून आरोपीला घेतले ताब्यात; गुन्ह्याची दिली कबुली

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाला गती दिली. या प्रकरणातील संशयित आरोपी पवन संभाजी सुतार (वय २९, मूळ रा. चांदेवाडी, कोल्हापूर) याचा माग काढत पोलिसांनी त्याला थेट मुंबई येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

८.४० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

त्यानंतर पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी आरोपीला औपचारिक अटक केली. पंचनामा करून त्याच्याकडून ६४.४८ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले हे सोन्याचे मंगळसूत्र लवकरच वरिष्ठांच्या उपस्थितीत मूळ मालक जाधव यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 25-08-2026