राजापूर आणि लांज्यात शिकारीच्या तयारीत असलेल्या ५ जणांना पोलिसांनी पकडले; बंदुका व काडतुसे जप्त

राजापूर आणि लांज्यात शिकारीच्या तयारीत असलेल्या ५ जणांना पोलिसांनी पकडले; बंदुका व काडतुसे जप्त

दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये शस्त्रांसह पिकअप गाडी हस्तगत; पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ला मोठे यश

*राजापूर / लांजा* : रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी विनापरवाना बंदुका, काडतुसे आणि टॉर्च घेऊन फिरणाऱ्या ५ जणांना राजापूर आणि लांजा पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये रंगेहात ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध शिकारींवर पोलिसांनी कडक नजर ठेवल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही घटनांत संशयितांविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये (आर्म्स ॲक्ट) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

*राजापूर पोलिसांची कळसवली येथे मध्यरात्री कारवाई*

राजापूर पोलिसांचे पथक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत असताना कळसवली परिसरात तिघेजण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशय आल्याने त्यांना हटकले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक आणि शिकारीसाठी लागणारे टॉर्च मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी पिकअप वाहनासह २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमित कृष्णा बाणे, योगेश नारायण बाणे (दोघे रा. कळसवली) आणि विजय काशीनाथ तरळ (रा. तरळवाडी, कळसवली) या तिघांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tata aeris

*लांज्यात १२ बोअरची बंदूक व जिवंत काडतुसांसह दोघे ताब्यात*

दुसऱ्या कारवाईत, लांजा पोलीस ठाण्याचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना आंजणारी-शिरंबवली रस्त्यावरील ओवलाचा दांडा परिसरात झाडाझुडपांमध्ये दोघे दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दीपक वसंत पाष्टे (वय ३३ वर्षे, रा. पाष्टेवाडी, आंजणारी) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत (वय ३५ वर्षे, रा. कशेळी, रत्नागिरी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १२ बोअरची एक बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि टॉर्च असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल सापडला.

*आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे दाखल; पुढील तपास सुरू*

दोन्ही प्रकरणांमध्ये रानटी प्राण्यांची अवैध शिकार करण्याच्या उद्देशानेच ही शस्त्रे बाळगण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लांजा आणि राजापूर पोलिसांनी संशयितांविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले असून, ही शस्त्रे कुठून आणली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.