कन्यारत्न मातांना ‘आशीर्वादाचा दिवा’ देऊन गौरव; अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान
*चिपळूण : *एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१, बीट दादर-२ अंतर्गत वालोपे येथे ‘सेवा संकल्प अभियान’ विविध नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले. आरोग्य, सुदृढ पोषण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करत या अभियानाने संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
*पारंपरिक भारुड, पोषण आरती आणि पाककृती प्रदर्शन :*
कार्यक्रमाचे औचित्य साधून पौष्टिक पाककृती व आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक लोककला भारुड आणि सुश्राव्य ‘पोषण आरती’ सादर करत सुदृढ आरोग्याचा संदेश अत्यंत मनोरंजक आणि प्रभावी पद्धतीने उपस्थितांपर्यंत पोहोचवला. या सांस्कृतिक सादरीकरणाला ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.

*मातांचा सन्मान व चिमुकल्यांना फळवाटप :*
या विशेष सोहळ्यात मुलगी जन्माचे उत्साहात स्वागत करत कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांना सन्मानपूर्वक ‘आशीर्वादाचा दिवा’ देण्यात आला. तसेच ‘लेक लाडकी योजना’ आणि ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व चिमुकल्यांना फळवाटप करण्यात आले, तर ग्रामपंचायत वालोपे यांच्यावतीने अविरत सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा यथोचित गौरव करण्यात आला.
*मान्यवर व महिलांची मोठी उपस्थिती :*
या कार्यक्रमास माजी सरपंच अनिशा काजवे, माजी उपसरपंच समिधा कदम, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर, अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक सावंत सिस्टर, सीएचओ श्रीमती शेख, पोलीस पाटील माधवी जाधव, बचत गटाच्या सीआरपी रसिका आयरे, स्वाती सोलकर आणि ग्रामपंचायत अधिकारी विश्वास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविका सायली जाधव, रेशमा धामणकर, अंगणवाडी सेविका ऋतुजा शिरकर, मनस्वी शिरकर, श्रेया धामणकर, मदतनीस भार्गवी गोरीवले, विद्या करंजकर, सुप्रिया नवेले आणि ग्रामपंचायत कर्मचारी अनंत आग्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविकात पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर यांनी अभियानाचा हेतू मांडला, तर सावंत सिस्टर यांनी पोषणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी केले.













