थंडी सुरू होण्याआधीच उन्हाचा तडाखा; रत्नागिरी जिल्ह्याचा पारा थेट ३७ अंश सेल्सिअसवर

थंडी सुरू होण्याआधीच उन्हाचा तडाखा; रत्नागिरी जिल्ह्याचा पारा थेट ३७ अंश सेल्सिअसवर

‘ऑक्टोबर हीट’च्या झळांनी नागरिक हैराण; पहिला पंधरवडा संपण्याआधीच तापमानात मोठी वाढ

*रत्नागिरी : *यंदा थंडीची चाहूल लागण्याआधीच नागरिकांना तीव्र उन्हाचा आणि उकाड्याचा तडाखा सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर महिना सुरू होताच ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव तीव्रतेने जाणवू लागला असून, पहिला पंधरवडा संपण्यापूर्वीच तापमानाचा पारा तब्बल ३७ अंशांवर पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले, तर किमान तापमानही २५ अंश सेल्सिअस इतके राहिले.

*दुपारच्या वेळी असह्य उकाडा आणि चटके*

परतीच्या पावसाच्या वातावरणानंतर ऑक्टोबर महिन्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे वातावरणातील आर्द्रता आणि उकाड्यात अचानक मोठी वाढ झाली आहे. सकाळपासूनच हवेत उष्णता जाणवू लागते, तर दुपारच्या वेळेस पडणाऱ्या कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. कमाल तापमानाने ३७ अंशांची पातळी गाठल्याने रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Tata aeris

*आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन*

कमाल आणि किमान तापमानातील तफावत तसेच वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन, सर्दी आणि तापासारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी प्रखर उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी व लिंबू सरबत किंवा ताकासारख्या द्रवपदार्थांचे सेवन करावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.