गेल्या १४ वर्षांची परंपरा कायम राखत चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज; दादर स्थानकातून सुटणार ट्रेन
मोदी एक्सप्रेस कोकणात धावणार असून गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी १०.३० वाजता ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होईल.
ही विशेष रेल्वे मुंबईहून सुटल्यानंतर रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. प्रवासादरम्यान चाकरमान्यांच्या खाण्यापिण्याची आणि पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
बुकिंग प्रक्रिया आणि संपर्काचे आवाहन
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील प्रवाशांनी स्थानिक भाजप मंडलाध्यक्षांशी संपर्क साधावा, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधून आपले बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोदी एक्सप्रेस कोकणात धावणार: १४ वर्षांची अविरत परंपरा
गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोणत्याही अडचणींशिवाय गावाकडे पोहचवण्यासाठी ही सेवा चालवली जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.
चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
“दरवर्षी प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून मनापासून आनंद होतो. यंदाही नाचत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’ सज्ज आहे. सर्व चाकरमान्यांनी आपल्या हक्काच्या गाडीने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गावी यावे,” असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:15 28-08-2026














