‘फिट इंडिया’ चळवळींतर्गत तीन दिवशीय देशव्यापी अभियान; मैदानी खेळ, निबंध व चित्रकला स्पर्धा भरवणार
देवरुख:
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदा ‘फिट इंडिया’ चळवळीअंतर्गत ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेखाली २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत तीन दिवशीय देशव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत स्थानिक शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा स्पर्धा, निबंध व सायकल रॅलीचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिवसनिहाय उपक्रमांची आखणी
- २८ ऑगस्ट (‘आदर व लोकसहभाग’): सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. तसेच ‘फिट इंडिया तंदुरुस्ती प्रतिज्ञा’ घेतली जाईल. विद्यार्थ्यांसाठी ‘२९ चॅलेंज’, ‘पास द बॉल’, ‘स्पोर्ट बंधन’ यांसारखी क्रीडा आव्हाने तसेच निबंध, चित्रकला आणि मार्किंग स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
- २९ ऑगस्ट (मुख्य क्रीडा दिन – ‘एक घंटा खेल के मैदान में’): या दिवशी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी किमान एक तास मैदानावर आवडीचा खेळ खेळणे अपेक्षित आहे. वर्ग विरुद्ध वर्ग तसेच शिक्षक विरुद्ध विद्यार्थी यांच्यात व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, लगोरी, लेझिम आदी पारंपरिक व देशी खेळांचे मैत्रीपूर्ण सामने आयोजित केले जातील. या दिवशी विद्यार्थी व शिक्षकांनी क्रीडा पोशाख (Sports Uniform) परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- ३० ऑगस्ट (‘गतिशीलता’): या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थी, एनसीसी व एनएसएस स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘संडेज ऑन सायकल’ अंतर्गत सायकल रॅली, प्रभात फेरी किंवा वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे.
छायाचित्रे व माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश
दरम्यान, शाळा व महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या उपक्रमांची छायाचित्रे, व्हिडिओ तसेच लोकसहभागाची सांख्यिकी माहिती अधिकृत पोर्टलवर आणि संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिन अभियान यशस्वी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना तातडीने सर्व शैक्षणिक संस्थांना देण्याचे निर्देश क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 28-08-2026














