बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट एपीके लिंक पाठवून केली लूट; पालकोंड येथील ग्रामस्थाची फसवणूक
ऑनलाइन फसवणूक मंडणगड तालुक्यातील पालेकोंड येथील एका नागरिकाला केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या बहाण्याने बनावट ‘एपीके लिंक’ पाठवून २ लाख ७६ हजार रुपयांना गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील माळी (वय ४७ वर्ष, रा. पालेकोंड, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांच्या मोबाईलवर पाट (ता. मंडणगड) येथील स्थानिक ग्रामस्थ अशोक नटे यांच्या मोबाईल नंबरवरून एक मेसेज आला होता. बँक ऑफ इंडियाच्या नावाने पाठवलेली केवायसी अपडेटींगची एपीके (APK) लिंक फिर्यादीने खरी वाटल्याने ओपन केली. मात्र, ती लिंक उघडताच काही वेळातच सुनील माळी यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम परस्पर भामट्याने लांबवली.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी सुनील माळी यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या चौकशीवरून २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३:५० वाजता मंडणगड पोलिसांत गु.र.नं. ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) अधिनियमाचे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणातील ग्रामीण भागात सध्या मोबाईलवर बनावट एपीके लिंक आणि केवायसी मेसेज पाठवून आर्थिक लूट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे सक्रिय असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 28-08-2026














