पवार कुटुंबीयांच्या रक्षाबंधनावर यंदा दुःखाची सावली
राखी पौर्णिमा २०२६ या बंधुत्वाच्या पवित्र सणानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतानाच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मात्र काही जुन्या आठवणींमुळे भावनिक क्षण पाहायला मिळाले. दरवर्षी रक्षाबंधनाला पवार कुटुंबीयांच्या एकत्र येण्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असायचे. मात्र सात महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर यंदाच्या राखी पौर्णिमेला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या दिवंगत भावासाठी एक भावुक सोशल मीडिया पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या संदेशात नमूद केले. “प्रिय दादा… आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना मांडल्या. बालपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणे, एकमेकांवरील प्रेम आणि अभिमान हाच नात्याचा पाया होता, असे सांगत त्यांनी दादांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टवर नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ताई तुमची आणि दादांची भावाबहिणीची जोडी प्रेमाचे आदर्श प्रतीक होती, दादांनी सर्वांना भरभरून प्रेम दिले,” अशा भावना अनेक युजर्सनी व्यक्त केल्या. दादा आज पाठीशी नसले तरी त्यांच्या आठवणी कायम राहतील, अशी प्रतिक्रिया एका युजरने नोंदवली.
दुसऱ्या बाजूला राजकीय क्षेत्रात रक्षाबंधनाचा सण स्नेहाच्या वातावरणात साजरा झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. “महाराष्ट्रातल्या लेकीबाळींचा आत्मसन्मान राखण्यासाठी भाऊ म्हणून आपण कायम हवे आहात, सतत हसत राहा आणि तणावमुक्त राहा,” असा संदेश अंधारे यांनी सोशल मीडियाद्वारे दिला.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकीकडे भावाच्या विरहाचे अश्रू तर दुसरीकडे राजकीय सहकाऱ्यांमधील विश्वासाचे नाते, असे दोन्ही पैलू या वर्षी पाहायला मिळाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 28-08-2026














