Ratnagiri District Bank: शासनाच्या सर्व निकषांमध्ये जिल्हा बँकेची कामगिरी उल्लेखनीय; सहकार विभागाचे अपर निबंधक संतोष पाटील यांचे गौरवौद्गार

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचा आढावा; नाटे सहकारी संस्थेस सदिच्छा भेट

रत्नागिरी :

राज्य शासनाच्या सहकार विभागाचे अपर निबंधक व सहसचिव संतोष पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट देऊन बँकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीबाबत पूर्ण समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा बँक ही राज्यातील अग्रेसर जिल्हा बँकांमध्ये समावेश असणारी बँक असून नाबार्ड तसेच शासनाच्या सर्व निकषांमध्ये तिची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे, असे गौरवौद्गार संतोष पाटील यांनी काढले.

धोरणात्मक अडचणी आणि बँकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा

अपर निबंधक संतोष पाटील यांनी बँकेच्या कामाचा आढावा घेताना कोकण विभागामध्ये शेती कर्जवाटपामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच सहकार क्षेत्रातील बँकांना प्रगती करताना कोणत्या धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे, यावर सखोल चर्चा केली.

या भेटीदरम्यान बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी जिल्हा बँकांना असणाऱ्या मर्यादा व धोरणात्मक अडचणी मांडल्या. बँकेचे एक्स्पोजर लिमिट, कोकणातील सामाईक ७/१२ मुळे कर्ज वितरणावर होणारा परिणाम आणि कोकणातील युवकांचे वाढते स्थलांतर यांसारख्या समस्यांवर शासन स्तरावर धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे मत डॉ. चोरगे यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा अपर निबंधकांसमोर सादर केला.

या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी तसेच बँकेचे संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील ‘नाटे’ विविध कार्यकारी सहकारी संस्थेस भेट

जिल्हा बँकेच्या आढाव्यानंतर संतोष पाटील यांनी राजापूर तालुक्यातील शासनाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्राप्त नाटे विविध कार्यकारी सहकारी संस्थेस भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या भेटीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात २ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नवीन कर्ज वाटपाचा चेक वितरित करण्यात आला.

तसेच, संस्थेने नव्याने सुरू केलेल्या बचत योजनेतील ५ खातेदारांना पासबुक आणि संस्थेच्या सभासदांना वृक्षारोपण संकल्पनेतून सुपारीच्या रोपांचे वाटप संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिरिक्त व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन

उपस्थित संस्था समिती सदस्य, सभासद व सचिवांशी चर्चा करताना अपर निबंधक संतोष पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. केवळ कर्जव्यवहारांवर अवलंबून न राहता अतिरिक्त व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी संस्थेला मार्गदर्शन केले व राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.

त्यांनी संस्थेच्या धान्य विभाग, एसटी आरक्षण, किटनाशके विभाग, शेती अवजारे, प्लास्टिक विभाग, ग्राहक भांडार व सीएससी सेंटर इत्यादी विभागांना भेट देऊन समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, जिल्हा बँक संचालक अमजद बोरकर, बँकेचे सरव्यवस्थापक संदीप तांबेकर, राजापूर नाटे संस्थेचे अध्यक्ष विलास फणसेकर व इतर व्यवस्थापक समिती सदस्य व सचिव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 28-08-2026