चिपळुणात अतिक्रमणविरोधी हटाव मोहीम: अनधिकृत जाहिरात फलकांवरही कठोर कारवाईचा नगर परिषदेत एकमुखी ठराव

गोसावी समाज स्मशानभूमीसाठी राखीव जागेची तातडीने मोजणी करण्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे निर्देश

चिपळूण शहर :

शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी अतिक्रमेण तसेच अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग्स) या गंभीर विषयांवरून चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने कठोर कारवाई सुरू करावी, असा एकमुखी निर्णय सभागृहाने घेतला आहे. गुरुवारी सकाळी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सांस्कृतीक केंद्राच्या तालीम सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष उमेश सकपाळ होते. या बैठकीत शहरातील अनेक विकासकामांना आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

सोलर पथदीपांचा निर्णय आणि विकासकामांवरील चर्चा

नगर परिषदेच्या या सभेत शहरातील सर्व प्रभागां मिळून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील सर्व प्रभागांत व मुख्य ठिकाणी सोलर पथदीप आणि हायमॅक्स दिवे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आरोग्य सभापती शुभम पिसे यांनी स्पष्ट केले की, सोलर पथदीप उभारणारी संबंधित कंपनीची समिती प्रत्यक्ष पाहणी करेल व आवश्यक त्या ठिकाणी दिवे उभारले जातील. यासाठी नगरसेवकांनी दिव्यांची गरज असलेल्या ठिकाणांची यादी सादर करावी, असे आवाहन करण्यात आले.

निधी उपलब्ध असूनही कामे सुरू न झाल्याबद्दल काही नगरसेवकांनी विचारणा केली असता, तांत्रिक मंजुरी मिळण्यास शासनाकडून कालावधी लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अतिक्रमण आणि अनधिकृत फलकांवर कठोर कारवाईची मागणी

नगर परिषद हद्दीत दररोज उभारले जाणारे बेकायदेशीर खोके आणि अनधिकृत जाहिरात फलकांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे नगरसेवक विकी लवेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर सर्वच सदस्यांनी एकमुखाने प्रशासनाने तातडीने कठोर मोहीम हाती घेऊन ही अतिक्रमेण हटवावीत, अशी मागणी केली.

गोसावी समाज स्मशानभूमी जागेची मोजणी

सभेच्या शेवटच्या टप्प्यात नगरसेवक संदीप भिसे यांनी शंकरवाडी येथील गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रलंबित प्रश्न उपस्थित केला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नगर परिषदेकडे असलेल्या संबंधित आरक्षित जागेची तातडीने मोजणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

नगर परिषद सभांचे थेट प्रक्षेपण होणार

काँग्रेसचे गटनेते व नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी नागरिकांना नगर परिषदेचे कामकाज थेट पाहता यावे, यासाठी सभांचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) करण्याची मागणी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, नगर परिषदेची नवी इमारत उभी राहिल्यानंतर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे सभांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी उपलब्ध केले जाईल. या सूचनेला सभागृहाने सर्वानुमते मान्यता दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-08-2026