Cyber Fraud Ratnagiri: सायबर फसवणुकीविरोधात रत्नागिरीत ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘महाजनजागृती मोहीम’; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश

ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यांचा सायबर विमा उतरवण्याच्या बँकांना सूचना; एका आढावा बैठकीत प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सायबर फसवणुकीविरोधात रत्नागिरीत वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पोलीस, बँका आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सायबर गुन्ह्यांच्या विशेष आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार आणि अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह प्रमुख बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

अवघ्या दोन मिनिटांत ८७ लाखांची फसवणूक

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात सायबर भामट्यांनी ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तामिळनाडूतील खात्यांमार्फत तब्बल १,४०० विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे त्यांनी उघड केले. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांची सतर्कता हाच सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर फसवणुकीविरोधात रत्नागिरीत बँकांना दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

  • ज्येष्ठांच्या खात्यांना सायबर विमा: तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची बचत सुरक्षित राहावी, यासाठी त्यांच्या खात्यांचा सायबर विमा उतरविण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या.
  • संशयास्पद व्यवहारांवर ‘रेड अलर्ट’: एखाद्या खात्यातून अचानक मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्यास बँकांनी खातेदार तसेच पोलिसांना तत्काळ अलर्ट द्यावा.
  • डेटा सुरक्षेला प्राधान्य: खातेदारांची वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
  • तपासात तातडीने सहकार्य: सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक माहिती व तांत्रिक सहकार्य पोलिसांना विनाविलंब उपलब्ध करून द्यावे.

लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन

सायबर भामट्यांविरोधातील लढाई केवळ पोलिसांची जबाबदारी न राहता ती लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्यास सायबर गुन्ह्यांना प्रभावीपणे आळा घालता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:27 28-08-2026