Pedhambe Bridge Traffic Jam: चिपळूण-कराड मार्गावरील धोकादायक पेढांबे पुलावर वाहतूक कोंडी; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

अरुंद पुलावरून अवजड वाहनांची सतत वर्दळ; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर स्थानिक संतप्त

पेढांबे पुलावर वाहतूक कोंडी झाल्याची घटना चिपळूण-कराड मार्गावर गुरुवारी (दि. २७) सायंंकाळी घडली आहे. अत्यंत धोकादायक बनलेल्या या पुलावर दोन्ही बाजूंनी वाहने आल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या अरुंद पुलावरून नियमितपणे अवजड वाहनांची मोठी वाहतूक सुरू असल्याने भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलोरे मार्गाकडे जाणाऱ्या या पेढांबे पुलावरून चोवीस तास वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, पूल अत्यंत अरुंद असल्याने एकावेळी एकाच वाहनाला ये-जा करणे शक्य होते. गुरुवारी सायंकाळच्या वेळी दोन्ही बाजूने एकदम वाहने आल्यामुळे पुलाच्या मध्यभागीच कोंडी झाली. यामध्ये अनेक अवजड वाहने आणि इतर गाड्या तब्बल तासभर अडकून पडल्या होत्या.

उल्लेखनीय आहे की, या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद देखील केला होता. तरीही या धोकादायक पुलावरून सुरक्षिततेची कोणतीही ठोस यंत्रणा नसताना अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेच या पुलाच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्थेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 28-08-2026