Khed Mahadnaka Road: खेड महाडनाका जड्याळवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनधारक आणि नागरिक त्रस्त

संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष; तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

खेड महाडनाका रस्ता परिसरातून जड्याळवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भरणे-खेड मार्गावरील या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असून दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे लहान-मोठे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

महाडनाका परिसरातून जड्याळवाडीकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर स्थानिक नागरिकांची तसेच वाहनांची सतत मोठी रहदारी असते. परंतु, रस्त्याच्या या बिकट दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 28-08-2026