भाजप राज्य अल्पसंख्याक मोर्चाची २३ जणांची कार्यकारिणी जाहीर; रत्नागिरीतील कामाची दखल
राज्य अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्षपदी बिजली खान यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टीने केली आहे. भाजपच्या राज्य अल्पसंख्याक मोर्चाच्या २३ नूतन पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
खासदार नारायण राणे कुटुंबीयांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल बिजली खान यांनी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी उघड प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभाही आयोजित केल्या होत्या. त्यांच्या या संघटनात्मक कामाची आणि सक्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांना सुरुवातीला रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपद बहाल केले होते.
जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी राजीवडा येथील २५० मीटरच्या मोठ्या मासेमारी जेटीच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले. यासंदर्भात त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता. मंत्री नितेश राणे यांनी या मागणीची महाराष्ट्र सागरी मंडळाकडे शिफारस केली. ही जेटी साकारल्यानंतर राजीवडा, कर्ला, भाट्ये, फणसोप अशा अनेक गावांमधील मच्छीमार नौकांना समुद्रातून येण्या-जाण्यासाठी योग्य चॅनेलसह मासे उतरवण्याचे मोठे केंद्र उपलब्ध होणार आहे. याशिवाय, सहकारी संस्थांना कंपन्यांकडून मिळणारे डिझेल महाग असल्याबाबत खा. राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी त्यांनी केली होती, ज्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्य अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी प्रदेश पातळीवरून जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून त्यांच्या कामाची माहिती घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहर अध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, जिल्हा महिला नेत्या वर्षा ढेकणे यांच्यासह इतर बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी अब्दुल बिजली खान यांच्या नावाची शिफारस केली होती. या शिफारशीनंतरच त्यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 28-08-2026














