मुंबई-गोवा महामार्गांवरील सर्वात मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात; प्रांत ऑफिससमोरील भरावाच्या कामाला वेग
चीपळूण उड्डाण पूल या मुंबई-गोवा महामार्गांवरील शहरातील सर्वात मोठ्या पुलाच्या स्लॅबचे आणि सर्व गर्डरचे काम आता पूर्ण झाले आहे. सध्या या उड्डाण पुलाला जोडणाऱ्या प्रांत ऑफिसकडील भरावाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या उड्डाण पुलाच्या एका लेनवरून हलकी वाहने सोडण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील बहादुरशेख चौकापासून सुरू झालेला हा उड्डाण पूल प्रांत कार्यालयासमोर संपून पाग बौद्धवाडी येथे उतरतो. सध्याच्या स्थितीत प्रांत कार्यालय ते अतिथी हॉटेल या दरम्यान भरावाचे काम डम्पर, जेसीबी आणि पोकलेन यांसारख्या यंत्रणांमार्फत वेगाने सुरू आहे. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने या कामाला अधिक वेग प्राप्त झाला आहे.
उल्लेखनीय आहे की, मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील हा उड्डाण पूल सर्वात लांबीचा पूल मानला जातो. सुरुवातीला बांधकामाधीन असलेला हा पूल कोसळल्याची घटना घडली होती; त्यानंतर नव्याने या पुलाची उभारणी करण्यात आली. आता स्लॅब व गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने पुलावरील साफसफाईच्या कामालाही सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार गणेशोत्सवापूर्वी किमान कार किंवा हलक्या वाहनांना या पुलावरून ये-जा करता यावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, हे संपूर्ण काम आगामी हवामान आणि पावसाच्या स्थितीवर अवलंबून असून, पावसाने साथ दिल्यास गणेशोत्सवात एक लेन वाहतुकीसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 28-08-2026














