शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवे बुद्रुक येथील व्यक्तीवर देवरूख पोलिसांत कारवाई
देवरूख बसस्थानक परिसरात मुलीचा एसटी पास असतानाही वाहकाने तिकीट काढल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला असून संतापलेल्या वडिलांनी वाहतूक निरीक्षकाची कॉलर पकडून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील एका व्यक्तीवर देवरूख पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक निरीक्षक तुषार कोळी (वय ३४, रा. देवरूख खालची आळी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार मिलिंद मुकुंद यादव (रा. निवे बुद्रुक, ता. संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
घटनाक्रम असा की, मिलिंद यादव यांची मुलगी बुधवारी एसटी बसने प्रवास करत होती. तिच्याकडे निवे बुद्रुक ते देवरूख असा एसटी पास उपलब्ध होता. मात्र, ती बावनदी येथे एसटीत चढल्याने वाहक रजनी जाधव यांनी तिच्याकडून पैसे घेऊन तिकीट फाडले.
मुलीकडून तिकीट काढल्याचा राग आल्याने मिलिंद यादव हे पत्नी व मुलीसह देवरूख बसस्थानकात आले. त्यांनी तेथे कार्यरत असलेले वाहतूक निरीक्षक तुषार कोळी यांच्या अंगावर धावून जात त्यांची कॉलर पकडली. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरत शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे कोळी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 28-08-2026














