अज्ञात कारणातून उचलले टोकाचे पाऊल; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
रत्नागिरी: Nevre Self Immolation Incident संदर्भात रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-काजरभाटी येथील एका प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नवनाथ दशरथ पाटील (वय ४९, रा. नेवरे-काजरभाटी, रत्नागिरी) असे स्वतःला पेटवून घेऊन जीव गमावलेल्या प्रौढाचे नाव आहे.
पडवीत भाजलेल्या अवस्थेत ओरडताना आढळले
या घटनेबाबत अमित गुरुनाथ पाटील यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास अमित पाटील हे नेवरे बाजारपेठेत असताना त्यांच्या बहिणीने (अंकिता) त्यांना फोन करून काका नवनाथ पाटील हे राहत्या घराच्या मागील पडवीमध्ये भाजलेल्या अवस्थेत ओरडत असल्याचे सांगितले.
जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
घटनेची माहिती मिळताच अमित पाटील यांनी तातडीने घरी धाव घेतली. त्यांनी स्थानिक शेजाऱ्यांच्या मदतीने नवनाथ पाटील यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीररीत्या भाजल्यामुळे उपचार सुरू असतानाच दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
नवनाथ पाटील यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या दुर्देवी घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 29-08-2026














