एकमार्गी रस्त्याने चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात; शहर पोलिसांकडून शोध सुरू
रत्नागिरी: Ratnagiri Hit and Run प्रकरणी समसमोरील दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी, २३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शहरातील साळवी स्टॉप परिसरात घडली.
एकमार्गी रस्त्यावरून चुकीच्या दिशेने येत दिला धडक
याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप लक्ष्मण भरते (वय ३२) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (MH-08-AR-0159) कोल्हापूर ते रत्नागिरी शहर मुख्य रस्त्याने येत होते. त्याच वेळी साळवी स्टॉप येथे अज्ञात दुचाकीस्वार आपली दुचाकी घेऊन रत्नागिरी शहर ते नाचणे लिंक रोडकडे जाण्यासाठी एकमार्गी रस्त्याने (One-Way) चुकीच्या दिशेने वेगाने आला. त्याने समोरून येणाऱ्या संदीप भरते यांच्या दुचाकीला थेट धडक दिली.
चालक किरकोळ जखमी; दुचाकीचे नुकसान
या अपघातात संदीप भरते यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर संशयित अज्ञात दुचाकीस्वार आपली गाडी घेऊन तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला.
अज्ञात चालकाचा शहर पोलिसांकडून शोध सुरू
अपघात करून पसार झालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे शहर पोलिस फरार दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 29-08-2026














