Ativrushti Bharpai Madat: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; २३ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर

१७ हजार २४५ शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे मिळणार थेट मदत; अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण विभागाचा समावेश

अतिवृष्टी भरपाई मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली असून जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्य सरकारने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना मिळणारा हा मदतीचा निधी त्यांच्या कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करून घेतला जाऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण विभागातील तब्बल १७,२४५ बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी या संदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून सर्व बाधित शेतकऱ्यांना ‘डीबीटी’ (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे मदत दिली जाणार आहे.

राज्यभरातील एकूण ११,२०७.७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत मंजूर झाली आहे. विभागातनिहाय मदतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • अमरावती विभाग: अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील ९,६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख रुपये.
  • पुणे विभाग: पुणे व सातारा जिल्ह्यातील ६,८८५ बाधित शेतकऱ्यांसाठी ९ कोटी १३ लाख रुपये.
  • नागपूर विभाग: वर्धा जिल्ह्यातील ६६१ बाधित शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपये.
  • कोकण विभाग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ बाधित शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपये.

मदतीचे वाटप करताना कोणत्याही प्रकारची द्विरुक्ती (एकाच व्यक्तीला दोनदा लाभ) होणार नाही याची कडक खबरदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. तसेच मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही शासनाने जारी केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 28-08-2026