आमदारांचे पगार कमी करून महिलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी
अमरावती :
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सत्ताधारी आमदार रवी राणा यांनी लाडक्या बहिणींच्या सन्मानधनात दुप्पट वाढ करून ते दरमहा १५०० रुपयांवरून थेट ३००० रुपये करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, यासाठी गरज पडल्यास राज्यातील आमदारांचे पगार कमी करा, मात्र लाडक्या बहिणींना ३००० रुपये मानधन द्या, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
अमरावतीत हजारो महिलांनी बांधली राखी
रक्षाबंधनाच्या दिवशी अमरावती येथे आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार रवी राणा यांना मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. रक्षाबंधनाच्या दिवशी शासनाने जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करून दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करून हा मार्ग मोकळा करण्यात आला. आता या मानधनात वाढ करून ते ३००० रुपये करावे, अशी आग्रही मागणी रवी राणा यांनी केली असून या मागणीची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत महत्त्वपूर्ण मध्यस्थी
दरम्यान, अमरावतीवरून यवतमाळ येथील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निवासाच्या दिशेने कूच करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आंदोलक विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन परत यावे, असे आवाहन त्यांनी केले. येत्या ७ सप्टेंबर रोजी मुंबईतील मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विद्यार्थ्यांची अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
‘बैठकीत तोडगा न निघाल्यास मी स्वतः आंदोलनात उतरेल’
मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीबाबत अधिकृत पत्र दिले असल्याने विद्यार्थ्यांनी पत्राचा मान ठेवून आंदोलन स्थगित करावे, असे रवी राणा म्हणाले. तसेच ७ सप्टेंबरच्या बैठकीत जर विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर आपण स्वतः विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, आंदोलक विद्यार्थी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी यवतमाळच्या दिशेने आपला मोर्चा सुरूच ठेवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 28-08-2026














