Vidyanand Bapat Attack News: डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर थेट लाईव्ह मुलाखती दरम्यान हल्ला

तरुणांची मारहाण; राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया

पुणे:

Vidyanand Bapat Attack News प्रकरणी पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने लावून धरणारे पुण्यातील रहिवासी विद्यानंद बापट यांच्यावर टीव्ही ९ (TV9) मराठी या वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देत असताना काही तरुणांनी अचानक हल्ला करून मारहाण केली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

या घटनेनंतर स्वतः विद्यानंद बापट यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी वृत्तवाहिनीशी निशस्त्रपणे संवाद साधत असताना काही टवाळखोरांनी येऊन मला बोलण्यापासून रोखले. कदाचित त्यांना माझी भूमिका पटली नसेल. मी निशस्त्र असल्याचा फायदा घेत त्यांनी मला मारहाण केली. केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठीच त्यांनी हे कृत्य केले असावे. जेव्हा मुद्द्यांना मुद्द्याने उत्तर देता येत नाही, तेव्हा अशा प्रकारच्या हिंसक मार्गांचा वापर केला जातो.” सदर संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आपली बाजू मांडताना बापट पुढे म्हणाले की, “मला कधीही कसल्याही सवंग प्रसिद्धीची हाव नव्हती. माझी ही भूमिका गणेशोत्सवाविरोधात अजिबात नाही, तर उत्सवातील घातक डीजेच्या आवाजाला माझा विरोध आहे. अशा वेड्या लोकांच्या कृत्याकडे मी दुर्लक्ष करतो.”

दरम्यान, या घटनेचे पुण्यात अत्यंत तीव्र पडसाद उमटत असून काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. “विद्यानंद बापट हे सामान्य पुणेकरांचा आवाज मांडत आहेत. त्यांचा सणांना विरोध नसून डीजेमुळे होणाऱ्या विकृतीला विरोध आहे. आज त्यांना थेट मारहाण करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली असून यावरून सत्ताधारी भाजपाची दादागिरी वाढल्याचे उघड होत आहे,” अशी थेट टीका जगताप यांनी केली.

कोण आहेत विद्यानंद बापट?

३७ वर्षीय विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या सात वर्षांपासून पुण्याच्या नारायण पेठेत स्थायिक आहेत. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेले बापट हे बीपीओ (BPO) क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे महानगरपालिकेत आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीत त्यांनी डीजे आणि ध्वनिवर्धकांविरोधात स्पष्ट मत मांडले होते. त्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बैठकीतून बाहेर काढले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आपल्या ओघवत्या आणि शुद्ध मराठी भाषेतील प्रभावी मांडणीमुळे ते सध्या राज्यभरात चर्चेत आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 03-09-2026