DJ Free Ganeshotsav Appeal: डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवा; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे आवाहन

‘एक गणेश मंडळ एक अंमलदार’ योजना लागू; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

रत्नागिरी:

DJ Free Ganeshotsav Appeal आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. “रत्नागिरीत गणेशोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारंपरिक वातावरणात साजरा केला जातो. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून रत्नागिरीने संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श ठेवावा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी अरांशा यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित थोरात उपस्थित होते.

‘एक गणेश मंडळ एक अंमलदार’ अन् डेसिबल मर्यादेचे पालन बंधनकारक

DJ Free Ganeshotsav Appeal आणि सुरक्षेच्या उपाययोजना

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले की, गतवर्षी रत्नागिरीतील गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडला होता, त्यामुळे जास्त पोलिसांची गरज भासली नव्हती. यावर्षीही अशाच प्रकारे उत्सव साजरा करण्यासाठी ‘एक गणेश मंडळ एक अंमलदार’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

डीजे आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला साजेसा नाही. डीजेच्या आवाजाचा त्रास लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि सध्या परीक्षा सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना होतो, याचे भान नागरिकांनी ठेवावे. गणेशोत्सवात स्पीकर्ससाठी डेसिबलची मर्यादा ठरवून देण्यात आली असून, नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

‘आपले सरकार’ पोर्टलवर नोंदणी आणि महामार्गावर १० मदत केंद्र

ज्या गणेश मंडळांची अजूनही अधिकृत नोंदणी झालेली नाही, त्यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करून तात्काळ नोंदणी करून घ्यावी. तसेच मंडप उभारताना रस्त्यावर अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी आणि मंडपात अग्निशमन साधने व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी. मिरवणुकीमध्ये गुलाल आणि लेझर लाईटचा वापर अत्यंत सतर्कतेने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई-गोवा महामार्गावर १० मदत केंद्र उभारण्यात येणार असून, तेथे मेकॅनिकची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आवश्यक पोलीस बंदोबस्त असेल आणि समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक तैनात केले जातील.

या बैठकीला रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार गणेशोत्सव मंडळ, श्री रत्नागिरीचा राजा मारुती मंदिर, टिळक आळी, क्रांतीमित्र मंडळ शांतीनगर, कोकण रेल्वे, ओम साई मित्र मंडळ साळवी स्टॉप, दत्तप्रसन्न मित्र मंडळ, प्रादेशिक मनोरुग्णालय, गीता भवन, महावितरण, बंदररोड, पाटबंधारे आणि मुरुगवाडा झोपडपट्टी मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 05-09-2026