प्राची शिंदे यांच्या २० वर्षांच्या वाटचालीचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्याकडून कौतुक
रत्नागिरी:
Ratnagiri Grahak Peth Exhibition आणि स्थानिक महिला उद्योगिनींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनाचे शहरातील जयेश मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात व थाटात उद्घाटन झाले. रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे आयोजित या महिला उद्योगिनींच्या श्रावण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका मेधा कुळकर्णी, लायन्स क्लबच्या शिल्पा पानवलकर आणि आयोजक प्राची शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“प्राची शिंदे यांच्याकडून खरी प्रेरणा घेण्यासारखी” – नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे
Ratnagiri Grahak Peth Exhibition आणि मान्यवरांचे मनोगत
उद्घाटनप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या, “गेल्या अनेक वर्षांपासून मी रत्नागिरी ग्राहक पेठेशी जोडलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी अनेक अडचणींवर मात करत, अजिबात न डगमगता स्थानिक महिला उद्योगिनींसाठी हे प्रदर्शन सलग १९-२० वर्षे चालू ठेवले आहे. खरोखरच त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा घ्यायला हवी. त्यांनी महिला उद्योगिनींचे पंख मजबूत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे मोठे कार्य केले आहे.”
नगरसेविका मेधा कुळकर्णी यांनी प्राची शिंदे यांच्या हसतमुख आणि सकारात्मक ऊर्जेचे कौतुक करत इतकी वर्षे सर्व महिलांना एकत्र घेऊन प्रदर्शन राबवणे ही सोपी गोष्ट नसल्याचे नमूद केले. महिला बाल कल्याण समिती सभापती प्रीती सुर्वे यांनी ७४ व्या वर्षीही तितक्याच तत्परतेने कार्यरत असणाऱ्या प्राची शिंदे यांच्या उपक्रमाचे अभिनंदन केले.
संघर्षाचा अन् आनंदाचा प्रवास; ८ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन खुले
आयोजक प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “माझ्या मैत्रिणी, यशश्री बचत गट आणि गेल्या दोन दशकांतील सहकार्यामुळेच या प्रदर्शनाची २० वर्षांची यशस्वी वाटचाल शक्य झाली. तळागाळातील महिला उद्योगिनींना व्यासपीठ मिळवून देतानाचा हा प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि तितकाच आनंदाचा राहिला आहे.”
या कार्यक्रमात माजी शिक्षिका सईदा बाग यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा निकम यांनी केले.
हे प्रदर्शन ८ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ११.०० ते रात्री ९.०० या वेळेत नागरिकांसाठी खुले असणार आहे. प्रदर्शनादरम्यान महिला उद्योगिनींसाठी प्रश्नमंजुषा, फनी गेम्स, फेस्टिव्हल मेकअप प्रात्यक्षिक, मंगळागौर कार्यक्रम, विपश्यना आनापान प्रात्यक्षिक तसेच लायन्स क्लब रत्नागिरीच्या उपक्रमांची माहिती असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्याला स्वाती सोनार, संध्या नाईक, सईदा बाग यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 05-09-2026














