रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष व २४ तास सिटी बस सेवा सुरू करण्याचे एसटी प्रशासनाचे आश्वासन
रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन खाजगी वाहतूकदारांकडून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आणि प्रवाशांना रास्त दरात प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्राहक पंचायत रत्नागिरी आक्रमक झाली आहे. चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक ते बस स्टँडदरम्यान २४ तास शटल बस सेवा सुरू करावी आणि खाजगी वाहतूकदारांवर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे.
Private Transport Fares आणि वाढीव दरांच्या तक्रारींची दखल
दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो प्रवासी कोकणात दाखल होतात. या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतूकदार अवाजवी आणि वाढीव भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करतात, अशा अनेक तक्रारी सातत्याने समोर येत असतात. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत रत्नागिरीचे अध्यक्ष संजय वैशंपायन आणि सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी परिवहन आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या मांडल्या.
रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष व शटल सेवा
या मागणीच्या अनुषंगाने एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. जानराव यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास प्रशासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. याशिवाय रात्री-अपरात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसेस आणि मनुष्यबळाची उपलब्धता विचारात घेऊन चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड अशी २४ तास शटल बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन श्री. जानराव यांनी दिले.
प्रवाशांच्या हक्कासाठी आग्रही भूमिका
या बैठकीदरम्यान ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन आणि सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी प्रवाशांच्या वतीने आग्रही भूमिका मांडली. गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि रास्त दरात व्हावा यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 07-09-2026














