Ganpatipule Beach Open: पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा खुला!

पर्यटनाला पुन्हा गती; जिल्हा प्रशासनाकडून तातडीने अंमलबजावणी; स्थानिक व्यवसायिक व पर्यटकांसाठी दिलासा

गणपतीपुळे : तब्बल ६० दिवसांच्या बंदीनंतर अवघे १० दिवस सुरू झालेला आणि तांत्रिक कारणास्तव पुन्हा बंद करण्यात आलेला प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनारा अखेर ५ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी पूर्ववत खुला करण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांच्या मागणीची तातडीने दखल घेत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला बीच तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

Ganpatipule Beach Open करण्याचा निर्णय; पालकमंत्र्यांसोबत पार पडली विशेष बैठक

३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनारा अचानक बंद केल्याने स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून ४ सप्टेंबरच्या सायंकाळी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.

सुरक्षा व्यवस्थेची वस्तुस्थिती आणि प्रशासकीय सूचना

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी सुरक्षेबाबतची वस्तुस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. सध्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचे सहा जीवरक्षक दोन सत्रांमध्ये कार्यरत असून, त्यांना जयगड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या होमगार्ड्सची मदत मिळत आहे. पर्यटकांना समुद्रातील धोक्यांबाबत सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्र्यांनी ५ सप्टेंबरपासून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचे निर्देश दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 07-09-2026