Illegal Fishing Ratnagiri: सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या ४ मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाची धडक कारवाई

मत्स्य विभागाची मोठी कारवाई; काळबादेवी समुद्रात सापडल्या ४ मिनी पर्ससीन नौका

रत्नागिरी : रत्नागिरीत पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू होऊन अवघे पाच दिवस पूर्ण होत असतानाच, राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या चार मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई केली आहे. काळबादेवी किनाऱ्यापासून अवघ्या ४ ते ५ नॉटिकल मैलांवर मासेमारी करत असताना या नौकांना रंगेहाथ पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या नौकांपैकी तीन मिरकरवाडा येथील, तर एक काळबादेवी येथील आहे.

Illegal Fishing Ratnagiri आणि गस्ती पथकाची कारवाई

१ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे ३०५ पर्ससीन नौकांना ॲक्सेस पास देण्यात आले असून त्यांना राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या बाहेरील समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही हंगामाच्या सुरुवातीलाच किनाऱ्याजवळ बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ‘शारदा’ गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना ही यशस्वी कारवाई केली.

कारवाई झालेल्या नौका व मालकांची नावे

मत्स्य विभागाने ताब्यात घेतलेल्या चार नौकांमध्ये मिरकरवाडा येथील तीन आणि काळबादेवी येथील एका नौकेचा समावेश आहे:

  • रिया-सारिया: सर्फराज नजीर पावसकर (मिरकरवाडा)
  • उबेदुल्ला अदनान: अस्लम हसन दर्वे (मिरकरवाडा)
  • आयरा झैनाब: मुस्सदीक अब्दुल हमीद जयगडकर (मिरकरवाडा)
  • ध्रुवी: धनंजय बिर्जे (काळबादेवी)

आयुक्तांच्या न्यायालयात होणार सुनावणी

सागरी हद्दीचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या या चारही नौकांविरोधात आयुक्तांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत म्हणाले, “समुद्रातील मासेमारीवर मत्स्य विभागाचे पूर्ण लक्ष असून अवैध मासेमारी करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 07-09-2026