Truck Accident Ratnagiri: कापडगाव येथील अवघड वळणावर ट्रक उलटला

केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाने वाचवले

रत्नागिरी : हातखंबा येथून पालीच्या दिशेने लोखंडी प्लेट घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला कापडगाव येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक देऊन उलटला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Truck Accident Ratnagiri ची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांची धाव

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एएसआय कमलाकर तळेकर, कॉन्स्टेबल नागेश खामकर आणि होमगार्ड सूरज सावंत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित मदतकार्य सुरू केले. चालक केबिनमध्ये गंभीररीत्या अडकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तात्काळ एमआयडीसी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन पथकाचे अथक प्रयत्न आणि चालकाची सुटका

एमआयडीसी अग्निशमन दलाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश बाबर, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे, अजय साळुंखे, कुणाल पाटील, अंकित पाटील आणि संकेत कुंभार यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तातडीने बचावकार्य हाती घेतले. पथकाने शर्थीचे प्रयत्न करत ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले.

महामार्गावरील वाहतूक पूर्ववत

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ बाधित झाली होती. घटनास्थळी उपलब्ध झालेल्या जेसीबीच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 07-09-2026