Mangalagaur Program: मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला प्रभाग क्रमांक ६ मधील महिलांचा स्नेहमेळावा!

८८ वर्षीय साळवी आजींचा दांडगा उत्साह; पर्यावरणपूरक जास्वंदीची रोपे देऊन मान्यवरांचे विशेष स्वागत

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ६ मध्ये महिलांसाठी विशेष स्नेहमिलन सोहळा पार पडला. नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या पुढाकाराने सिद्धिविनायक हॉल येथे ‘मंगळागौरीचा साज सख्यांच्या सहवासात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ३५० महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने फुगडी, जोगवा आणि पारंपरिक खेळांनी हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Mangalagaur Program चे औचित्य साधत जास्वंदीची रोपे देऊन पर्यावरणपूरक स्वागत

या कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळा पायंडा पाडत पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ न देता जास्वंदीची रोपे देऊन करण्यात आले. स्वागताच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. दीपप्रज्वलनानंतर सर्व महिलांनी मंगळागौरीचा जोगवा गात कार्यक्रमाची सुरवात केली.

८८ वर्षीय साळवी आजी ठरल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण

या सोहळ्यात ज्येष्ठत्वाची पर्वा न करता उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या ८८ वर्षीय साळवी आजी विशेष आकर्षण ठरल्या. त्यांनी पारंपरिक खेळांमध्ये सहभाग नोंदवत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. नगरसेविका मेधा कुळकर्णी यांनी साळवी आजींचा जास्वंदीचे रोप देऊन विशेष सत्कार केला.

महिला सक्षमीकरण आणि विविध स्पर्धांची रेलचेल

दैनंदिन धावपळीतून महिलांना विरंगुळा मिळावा आणि प्रभागातील आपुलकी अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात मेधा कुळकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमात फुगडी, उखाणे आणि मनोरंजनात्मक स्पर्धांचे सूत्रसंचालन प्रथमेश साळवी व ऐश्वर्या बापट यांनी केले. विजेत्या महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 07-09-2026