Sujay Vikhe Patil on DJ: आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, त्यामुळे तेथील युवकांना डीजे लागतो – सुजय विखे पाटील

Image ref 79925220. Copyright Rex Shutterstock No reproduction without permission. Please see www.rexfeatures.com for more information.

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. डीजे बंदीचा वाद, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक आणि कुकडी प्रकल्पाचा बोगदा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी पक्षाची आणि वैयक्तिक भूमिका स्पष्ट करत विरोधकांना इशारा दिला.

ग्रामीण भागात डीजेची गरज अन् नाशिक-पुणे रेल्वेवर वक्तव्य

गणेशोत्सवातील डीजे बंदीच्या वादावर बोलताना सुजय विखे म्हणाले, “मी विद्यानंद बापटासारखा मराठी बोलू शकत नाही. ग्रामीण भागात मोठ्या इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, त्यामुळे तेथील युवकांना डीजे लागतो आणि आम्ही तो वाजू देतो. मात्र शहरी भागातील वाहतूक, रुग्णालये यांमुळे तेथील प्रश्न वेगळे आहेत.” तसेच नाशिक-पुणे रेल्वे मार्ग शिर्डीवरून वळण्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “मी यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, हा साईबाबांचा चमत्कार आहे. मात्र, सरकारने पहिल्यांदा नाशिक-संगमनेर मार्गाला प्राधान्य द्यावे, मार्ग निघाला नाही तरच शिर्डीला द्यावा.”

अहिल्यानगर जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी स्पष्ट केले की, “कुठलीही निवडणूक लागली तरी माझे नाव येते. मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर बसायला आजही उत्सुक नाही. शेतकऱ्यांना न्याय देणे हाच माझा उद्देश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे नाव सांगतील तोच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसेल.”

काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निधी बंद करण्याचा इशारा

कार्यकारिणीच्या बैठकीला अनेक नगरसेवक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गैरहजर राहिल्याने विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पक्षाचे पद हे केवळ शोभेचे नाही. जे अधिकारी किंवा नगरसेवक पक्षासाठी वेळ देऊन काम करतील, त्यांनाच यापुढे निधी आणि पक्षाचे बळ दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह बोगद्याला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना इशारा देत, “येथे येण्यापूर्वी तुमच्या नेत्यांना विचारा मी काय आहे आणि मगच विरोध करायला या,” असा टोला त्यांनी लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 07-09-2026