भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर
जळगाव : जळगावमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याबाबत बोलताना केलेले एक विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. “भाजप जसे राजकीय पक्षांमधील लोक फोडते, तशीच शिक्षकांनी इंग्रजी शाळांमधील मुले फोडून मराठी शाळांमध्ये आणली पाहिजेत,” असा अजब सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला. या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील राजकीय वाद चव्हाट्यावर आला आहे.
Gulabrao Patil Controversy: ‘हम दो हमारे दो.. और इंग्लिश में जाने दो’
शिक्षकांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “सरकारी शाळांमधील पटसंख्या टिकवणे हे मोठे आव्हान आहे. आधीच्या काळात एका कुटुंबात तीन-चार मुले असायची, त्यामुळे पटसंख्या टिकून राहायची. मात्र आता ‘हम दो हमारे दो.. और इंग्लिश में जाने दो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काळ बदलला असून प्रत्येक पालकाला आपला मुलगा इंग्रजी माध्यमात शिकला पाहिजे असे वाटते. यासाठी शिक्षकांनी इंग्रजी शाळांमधील मुले मराठी शाळांकडे आकृष्ट केली पाहिजेत.”
शिक्षकांसाठी ड्रेस कोड अन् मोबाईल वापरावरून मिश्कील टिप्पणी
शालेय शिस्तीबाबत बोलताना त्यांनी प्रत्येक शिक्षकाला शाळेत ड्रेस कोड असणे बंधनकारक असल्याचा पुनरुच्चार केला. “तुम्ही बाहेर जीन्स किंवा टी-शर्ट घाला, पण शाळेत शिक्षकाचा गणवेश असलाच पाहिजे, जेणेकरून शिक्षकाची ओळख निर्माण होईल.” स्वतःच्या मोबाईल वापराबाबत मिश्कील भाष्य करताना ते म्हणाले, “मी फक्त फोन उचलणे आणि करणे एवढाच मोबाईलचा वापर करतो. मला व्हॉट्सॲप समजत नाही, डोक्याला ताप घ्यायचाच नाही.”
गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर भाजपचा जोरदार पलटवार
गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “भाजप कधीही कार्यकर्ते फोडत नाही. जनतेची मने जिंकून आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक स्वेच्छेने भाजपमध्ये येतात. शिक्षक हे विद्यार्थी फोडत नसून संस्कारमय नागरिक घडवतात. शिक्षकांच्या व्यासपीठावरून अशा प्रकारचे राजकीय भाष्य करणे पूर्णपणे अयोग्य आहे,” अशा शब्दांत कुलकर्णी यांनी पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 07-09-2026














