Raj Thackeray Sound And Festivity Controversy: ‘धर्मांधपणा खड्ड्यातच घेऊन जाणार’; डॉल्बी आणि लेझर लाईटच्या उन्मादावर राज ठाकरे आक्रमक

उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणताय का?; मनसे प्रमुखांचा थेट सवाल

मुंबई : गणेशोत्सवातील डीजे, डॉल्बीचा वाढता आवाज आणि लेझर लाईटच्या वापरावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत या उन्मादावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. “सण आणि उत्सव कशाप्रकारे साजरे झाले पाहिजेत याचे स्पष्ट प्रोटोकॉल्स असले पाहिजेत. धर्मामध्ये बेभान होऊ नये, कारण धर्मांधपणा आपल्याला खड्ड्यातच घेऊन जाणार आहे,” असा घणाघाती इशारा त्यांनी दिला आहे.

Raj Thackeray Sound And Festivity Controversy: उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणताय का?

ठाण्यात आयोजित मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी डीजे आणि दहीहंडीतील वाढत्या विकृतीवर टीका केली. ते म्हणाले, “गणपती विसर्जन झाल्यानंतर घर मोकळे वाटल्याची खंत असण्याऐवजी आपण कसला आनंद व्यक्त करतोय? आणि डॉल्बी आणून काय साध्य होणार आहे? आपण उत्तरेतली संस्कृती महाराष्ट्रात आणतोय का? गोविंदाच्या वेळी महिलांना व्यासपीठावर आणून नाचवणे हे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये चालते. आपण त्यांना शिकवायचे की त्यांची विकृती आपण स्वीकारायची?”

‘लेझर लाईटमुळे अनेकांचे डोळे गेले; लोक हार्ट अटॅकने मरतात’

सणांच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांवर बोट ठेवताना ते म्हणाले, “लेझर लाईटमुळे अनेकांचे डोळे गेले आहेत, कान गेले आहेत. ज्याला थोडाही हृदयाचा त्रास असेल, तो या प्रचंड आवाजामुळे हार्ट अटॅकने मरू शकतो आणि अनेक लोक मेलेही आहेत. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरू केला, त्याला आपण कुठे नेऊन ठेवले आहे?”

मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी धर्माची गुंगी

राज ठाकरेंनी देशातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले, “जगातील इतर देश धर्माच्या चौकटीतून बाहेर पडून शिक्षण, व्यवसाय, उद्योग आणि पैशांवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र आपल्या देशात युवक, शिक्षण, नोकरी आणि शेतीच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. लोकांना जाणूनबुजून धर्माच्या वादात गुंतवून ठेवले जात आहे, जेणेकरून ते मूळ संकटांवर प्रश्न विचारणार नाहीत. आगामी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवून आणण्याचा डाव असू शकतो, त्यामुळे सुजाण हिंदू व मुस्लिमांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 07-09-2026