MPSC Paper Leak Protest Pune: एमपीएससी पेपरफुटीवरून पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; खा. सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा

मोर्चामध्ये मुलींची लक्षणीय उपस्थिती

पुणे : एमपीएससी (MPSC) पेपरफुटीच्या घटनांविरोधात पुण्यातील विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरून भव्य आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींची संख्या अत्यंत लक्षणीय आहे. पेपरफुटीची प्रकरणे रोखण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मोर्चाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

MPSC Paper Leak Protest Pune: ‘विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागणे सरकारचे अपयश’

विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. “विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन देशाची सेवा करायची सोडून त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, हे सरकारचे मोठे अपयश आहे. विद्यार्थी चर्चेसाठी तयार आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने एखाद्या जबाबदार व्यक्तीला पाठवून मुलांशी थेट चर्चा करून मार्ग काढावा,” अशी मागणी त्यांनी केली.

तंत्रज्ञानाचा वापर आणि एआयच्या मदतीने पेपरफुटी रोखण्याचे आवाहन

पेपरफुटीच्या वाढत्या घटनांवर बोलताना त्या म्हणाल्या, “आज जगभरात आणि भारतात अनेक मोठ्या परीक्षा पारदर्शकपणे होतात. मग याच परीक्षांचे पेपर कसे फुटतात? सध्याच्या काळात एवढे प्रगत तंत्रज्ञान आणि एआय (AI) उपलब्ध असताना त्याचा वापर करून पेपरफुटी रोखणे शक्य आहे. पेपरफुटी थांबवता येत नाही यावर माझा विश्वास नाही.”

MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यातील शेतकरी, महिला आणि युवक सर्वच घटक सध्या त्रस्त असून रस्त्यावर उतरले आहेत, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रशासनाला घेराव घातला. “विद्यार्थी MPSC अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत, सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा आणि त्वरित तोडगा काढावा,” असा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 07-09-2026