जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; सांडपाणी व अनधिकृत पोल्ट्रीच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश
रत्नागिरी : ‘राईट टू एज्युकेशन’ (RTE) प्रवेश प्रक्रियेमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अपात्र किंवा चुकीच्या अर्जदारांना प्रवेश दिल्याच्या तक्रारीची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) १५ दिवसांत सखोल चौकशी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
सांडपाण्याचा प्रश्न ७ दिवसांत मार्गी लावा
शहरातील सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी काटेकोर दक्षता घ्यावी. पुढील ७ दिवसांत हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
कळंबुशीतील अनधिकृत पोल्ट्रीची तात्काळ तपासणी
संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथे सुरू असलेल्या अनधिकृत पोल्ट्रीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होत असल्याची तक्रार लोकशाही दिनात दाखल झाली होती. यावर देवरूखच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) तात्काळ घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि हा प्रश्न विनाविलंब निकाली काढावा, असे आदेश देण्यात आले.
केवळ अर्ज वर्ग न करता पाठपुरावा करा
लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ज्या विभागांकडे नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी ते वेळेत मार्गी लावावेत. तक्रार अर्ज केवळ दुसऱ्या विभागाकडे वर्ग करून जबाबदारी झटकू नये, तर संबंधित विषयाचा ठोस पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.













