रत्नागिरी शहरात रिक्षाचालकांची मनमानी; मीटरऐवजी जादा भाडेवसुलीने प्रवासी त्रस्त

रत्नागिरी शहरात रिक्षाचालकांची मनमानी; मीटरऐवजी जादा भाडेवसुलीने प्रवासी त्रस्त

वाढीव भाडे घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी; ‘RTO ने सुधारित दरपत्रक लागू करावे’, रिक्षा व्यावसायिक संघटनेची भूमिका

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात काही रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे भाडे न घेता प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने जादा भाडे आकारले जात असल्याचे समोर आले आहे. या वाढीव भाडेवसुलीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, जादा पैसे उकळणाऱ्या रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वाढीव भाड्याचे समर्थन नाही; पण प्रशासनाने आमची बाजू ऐकावी: प्रताप भाटकर

प्रवाशांकडून वाढीव भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांच्या चुकीच्या वर्तनाचे आम्ही मुळीच समर्थन करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ‘रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटने’चे अध्यक्ष प्रताप भाटकर यांनी मांडली आहे. मात्र, त्याच वेळी प्रशासनाने केवळ कारवाईचा बडगा न उगारता रिक्षाचालकांच्या अडचणी व मागण्याही समजून घ्याव्यात, असे भाटकर यांनी स्पष्ट केले.

२०२२ नंतर नवीन दरपत्रक नाही; महागाई वाढल्याने रिक्षाचालकांचे नुकसान

वर्ष २०२२ नंतर रत्नागिरीत रिक्षांचे सुधारित दरपत्रक लागू करण्यात आलेले नाही. गेल्या काही वर्षांत सीएनजी व पेट्रोलचे दर, रिक्षांच्या किमती, स्पेअर पार्ट्स आणि देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुन्या दरपत्रकानुसार व्यवसाय करणे परवडत नसून रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

आरटीओकडून केवळ आश्वासने; आंदोलनाचा इशारा देऊनही अंमलबजावणी शून्य

सुधारित दरपत्रक लागू करण्यासाठी संघटनेने आरटीओ प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. ऑगस्ट महिन्यात संघटनेने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने नवीन दर लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची अद्याप कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने रिक्षाचालकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने तात्काळ सुधारित दरपत्रक जाहीर करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी प्रताप भाटकर यांनी केली आहे.