अमली पदार्थ नेटवर्क उद्ध्वस्त करणार
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील अमली पदार्थांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी समन्वित आणि देशव्यापी रणनीती आखली असून २०२९ पर्यंत ‘नशामुक्त भारत’ साकारण्याचे लक्ष ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अमली पदार्थांविरोधातील कारवाईची दिशा सरकारने बदलली असून केवळ छोट्या पातळीवरील तस्कर किंवा वापरकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण नेटवर्कवर हल्ला करण्याची रणनीती स्वीकारण्यात आली आहे. यामध्ये तस्करीचे आंतरराष्ट्रीय संबंध, अमली पदार्थांच्या व्यवसायासाठी होणारा आर्थिक पुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि त्यामागील प्रमुख सूत्रधार यांचा समावेश असल्याचे शाह यांनी सांगितले.
पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
डाव्या अतिरेकी कारवायांना आळा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भारताने ३१ मार्च २०२६ रोजी जवळपास सहा दशकांपासून सुरू असलेल्या डाव्या अतिरेकी कारवायांच्या आव्हानावर मात केली. सुरक्षा कारवाईसोबत विकास आणि जनतेचा विश्वास या तीन घटकांच्या माध्यमातून हे यश मिळाले आहे. ईशान्य भारतात२०१९ पासून १४ प्रमुख शांतता करार करण्यात आले असून, सुमारे ११ हजार सशस्त्र युवकांनी शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात प्रवेश केला, असेही त्यांनी सांगितले.
देशात तीन नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर कमी वेळेत गोव्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण २२ टक्क्यांवरून ५३.२ टक्क्यांवर पोहोचले. ही ३० टक्क्यांची वाढ आहे. हे प्रमाण येत्या काळात ७० ते ७५ टक्क्यांवर वाढण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 07-09-2026














