शासकीय भरतीत कोकणातील स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचा ठराव मंजूर; जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
BJP Ratnagiri Executive Meeting मध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संघटना वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले आहे. भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा आणि आढावा बैठक ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण यांनी गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात उतरले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज भाजपचे खासदार असून अनेक नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे कोणीही खचून न जाता तन, मन, धन अर्पण करून संघटन मजबूत करावे, असे चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाची कामे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
BJP Ratnagiri Executive Meeting Resolutions : स्थानिकांना शासकीय भरतीत प्राधान्याचा ठराव
या सभेदरम्यान आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील रोजगाराचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. कोकणातील शासकीय भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाल्यास कोकणातील बंद घरे पुन्हा उघडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मागणीबाबत कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत माहिती दिली. ज्या पदवीधरांची नावे अजून मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत, त्यांची नावे नोंदवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यातील भाजप प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगत, आगामी काळात भाजप ‘शत-प्रतिशत’ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजप प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, देवरूखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्यासह जिल्ह्यातील विविध मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 10-09-2026















